नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील तरुण शेतकऱ्याने भंगारातून घरी 55 फूट बूम स्प्रे मशीन बनवली आहे. या मशिनद्वारे 20 मिनिटात 10 एकर शेतीची फवारणी होते.
कमलेश अशोक चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कमलेश हा खासगी कंपनीत काम करत होता. पण वडिलांच्या निधनानंतर तो शेतीकडे वळला. त्यानंतर तो युट्युबवर बघून वेगवेगळे प्रयोग करु लागला.
आता त्याने ही अनोखी मशीन बनवली असून याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणणे योग्यच ठरते, आणि हे कमलेशने बनवलेल्या मशीनमुळे सिद्ध होते. ग्रामीण भागात अनेक बुद्धिमान तरुण आहेत, मात्र त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत मांडले जात आहे.
कमलेशने आपल्या मशीनसाठी साडेतीन लाख रुपये देऊन एक जुना ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्यासाठी त्याने पंजाबहून इजरायली बनावटीचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले, ज्याची किंमत 1 लाख 75 हजार रुपये होती. मागील दोन टायर सहा फूट उंच असून, पुढील दोन टायर साडे चार फूट उंच आहेत. तसेच, त्याने 1,000 लिटरची टाकी बसवली, ज्याचा खर्च 45 हजार रुपये आला.
ही टाकी ट्रॅक्टरच्या मध्यभागी बसवण्यात आली आहे, ज्यामुळे तोल संतुलित राहतो आणि ट्रॅक्टर पुढील बाजूने उचलला जात नाही याची खबरदारी घेतली गेली आहे. औषध फवारणीसाठी एक स्पीड पंप जोडण्यात आला आहे, जो एका मिनिटात 185 लिटर पाण्याचा प्रेशर निर्माण करतो. कीटकनाशक फवारणी करताना चालकाच्या अंगावर केमिकल येऊ नये म्हणून काचेची केबिन तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये पंखादेखील बसवण्यात आला आहे. कमलेशने हे संपूर्ण मशीन केवळ दोन महिन्यांत तयार केले आहे.
या मशीनचा मुख्य फायदा म्हणजे 55 फूट लांबीचा बूम स्प्रे वापरला जातो, ज्यामुळे दहा एकर क्षेत्रावर केवळ 20 ते 25 मिनिटांत फवारणी करता येते. या मशीनमुळे फवारणीच्या वेळी मजुरांना साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका राहत नाही. तसेच, फवारणी समप्रमाणात होते, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक त्या प्रमाणात औषध वापरले जाते. या मशीनमुळे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज नसते आणि त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते, असे कमलेशने सांगितले आहे.
0 टिप्पण्या